जळगाव हादरले; माजी महापौरांच्या मुलाची हत्या

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश सपकाळे यांच्यावर रात्री शिवाजीनगर स्मशानभूमिजवळ हल्ला चढवून अज्ञात हल्लेखोरांनी अतिशय क्रूर पध्दतीत खून केल्याने खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हा काल (बुधवारी) रात्री ११.३० वाजता राकेश सपकाळे (वय २८) हा स्मशानभूमी परिसरातून येत असताना दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर रस्त्यावरून येणार्‍या एका धावत्या ट्रकसमोर ढकलले.


या ट्रकचा फटका राकेशच्या डोक्याला बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. यानंतर मारेकर्‍यांनी चाकूने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर सपासप वार केले. ही माहिती मिळताच माजी महापौर अशोक सपकाळेंसह कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत राकेश याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणी करुन डॉक्टरांनी राकेश याला मृत घोषित केले.


दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिपेठेतील काही तरूणांसोबत त्याचे आधी भांडण झाले होते. यातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मारेकर्‍यांनी मारेकर्‍यांनी स्वत:ची दुचाकीही घटनास्थळी सोडून पळ काढल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे.