पत्रकारांच्या न्यायासाठी पुरोगामी पत्रकार संघाची मंत्रालयात धडक

पत्रकारांना 50 लाखाचे विमाकवच व सुसज्ज आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत मुख्यमंत्री व मंत्रीमहोदयांना निवेदन


सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठया प्रमाणात आहे. यातही पत्रकार बांधव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. मात्र इतके करूनही या खऱ्या कोरोना योद्धाना संघर्ष करावा लागत आहे. 


नुकतेच पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर तर मुंबईतील संतोष पवार यासारख्या पत्रकारांचा असूविधेमुळे हकनाक बळी गेला.  मुळात हा बळी कोरोना पेक्षा भयंकर अशा मुर्दाड आरोग्यव्यवस्थेचा बळी ठरला आहे.  तसेच 25 हुन अधिक  पत्रकारांचा कोरोना आजाराने आजपर्यंत मृत्यू झाला आहे. 


या मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच शासनाकडून देण्याबाबत वेळोवेळी सांगण्यात आले मात्र अजूनही त्याबाबत जाहीर घोषणा झाली नाही. पत्रकारांना 50 लाखाचे विमाकवच विनाविलंब द्यावे अशा  प्राथमिक मागणीसह  कोणत्याही कोरोनाबाधित पत्रकाराला सुयोग्य आरोग्यसुविधा पुरविणारा अध्यादेश काढावा याबाबत निवेदन देण्यात आले.


सदर निवेदन हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री कार्यालय तसेच आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्या स्वीय सहाय्यक यांना प्रत्यक्ष देण्यात आले. याबाबत बोलताना आरोग्य मंत्री यांचे सहाय्यक यांनी सदर अहवाल मुख्यमंत्री व मुख्य समितीकडे पाठविल्याचे सांगितले. तसेच याबाबत पुरोगामी पत्रकार संघासोबत संपर्कात राहून सदर अहवालाची प्रत देऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले.


याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आमच्या पत्रकार बांधवांच्या न्यायासाठी आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग निवडावा लागेल असे संस्थापक अध्यक्ष श्री विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.


यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे सचिव श्री प्रवीण परमार, राज्य सल्लागार श्री बाळासाहेब अडागळे, राज्य सहसंघटक श्री सागर ननावरे, निमंत्रक श्री प्रल्हाद पाटील, प.महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अमर राजपूत, रायगड उपाध्यक्ष श्री प्रशांत भोईर,पुणे शहराध्यक्ष सौं कांचन दोडे, पुणे शहरउपाध्यक्ष श्री राहुल पडवळ आदि पदाधिकारी उपस्थित होते.