विवेकाचा आवाज बुलंद करणे , विज्ञाननिष्ठ पिढी घडविणे हेच डॉक्टर दाभोळकरांचे स्वप्न

किशोर पाटील कुंझरकर यांचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेध घेणारा लेख 


अंगात उतरलेलं भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून झालेल्या मारहाणीत आज्जी व काकाचा मृत्यू अशा घटना आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील 21 व्या शतकाकडे वाटचाल करणारे आपल्या समाजात घडताना दिसून येतात. शिक्षणाचं प्रमाण कितीही वाढलं तरी मिरची व बाहुलीच्या वापराच प्रमाण अनेक ठिकाणी काय कमी होताना दिसत नाही. अगदी अलीकडे गाजत असलेल्या सुशांत सिंह या अभिनेत्याच्या घातपात आणि मृत्यू झालेल्या प्रकरणातही ही बाब समोर आलेली आहे.समाजातील याच अंधश्रद्धाळू मानसिकतेविरोधात दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी केली.


अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच विवेकवादी समाज घडवणं हे त्यांनी स्थापन केलेल्या समितीचं ध्येय. आमच्यासारखे युवक 2000 सालापासून त्यांना जोडले गेले. अगदी माझे सर्व मित्र आम्ही आमचे मार्गदर्शक अविनाश पाटील यांच्यासमवेत असल्यापासून या महाराष्ट्र अनिस शी  जोडल गेलो.धर्माच्या नावाखाली जोपासल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांविरोधात डॉक्टरांनी व समितीने त्यांनी आवाज उठवला.धर्माची चिकित्सा करून धर्माला विधायक रूप देण्याच काम केलं. या कामासाठी डॉक्टरांनी कार्यकर्ते घडवले, माणसं जोडली.आज प्रत्येक जिल्ह्यात अनिसची शाखा आहे. त्यांच्या खुनानंतर आता हीच माणसं, हेच कार्यकर्ते समितीचं काम पुढे घेऊन जात आहेत. अंधश्रद्धेचा, धर्माचा पगडा असणाऱ्या समाजात अशाप्रकारचं कार्य उभा करणं सोप्पी गोष्ट नव्हती. विरोधकांनी त्यांना,अनिसला धर्मविरोधी ठरवलं. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी संयमितपणे उत्तरं दिली.  दाभोलकरांच्या खुनाला आज 20 ऑगस्ट 2020 रोजी ७ वर्षे पूर्ण होत आहेत.महाराष्ट्र अनिस  एरंडोल तालुक्यात ची जबाबदारी सांभाळत असताना यापूर्वी जिल्हा कार्यकर्त्यांची जबाबदारी सांभाळली ज्येष्ठ असे डी एस कत्यारे, विनायक भाऊ, डॉक्टर जोशी, विश्वजीत चौधरी, लूल्हे सर अनेक मित्र जोडले गेले.


संत तुकाराम, गाडगे महाराज, आगरकर,महात्मा फुले, धो कर्वे, हमीद दलवाई या समाजसुधारकांचा वारसा डॉक्टर दाभोलकर पुढे घेऊन जात होते. त्यांनी सुरू केलेलं कार्य हे काही नवीन नव्हतं. पण हे कार्य सुरू करण्याची नितांत गरज होती. ते त्यांनी सुरू केलं. महाविद्यालयात विवेकवाहिनीची सुरवात केली. त्यातून आज विवेकवादी तरुण कार्यकर्ते घडत आहेत.महाराष्ट्रभर त्यांच्यासोबत अनेकदा करण्याचा योग आला मी जालना  जिल्ह्यात असतानादेखील जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे विवेक वाहिनीच्या रुपाने जबाबदारी मिळाले होती. त्याठिकाणी डॉक्टर मधुकर गायकवाड अनिल कुलकर्णी सर आदींचा सहवास लाभला. डॉक्टर समवेत पुणे मुंबई नाशिक जळगाव अनेक ठिकाणी विवेकाची चळवळ पुढे नेण्यासाठी उपक्रमात सहभाग घेण्याची संधी मला लाभली. दाभोलकरांनी ज्या प्रकारे समितीचा पाया रचला आहे ते पाहता त्यांच्या खुनानंतर समितीचं कार्य थांबणं शक्यच नाही.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे पाहून तरी असं कधीच वाटत नाही. या सगळ्या चळवळीत दाभोलकरांनी लिहिलेली पुस्तकं कार्यकर्त्यांसाठी, चळवळीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. दाभोलकरांशिवाय चळवळीला उत्तम मार्गदर्शकांची फौज लाभली. कॉ.गोविंद पानसरे, डॉ.लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, बाबा आढाव, अनिल अवचट, पुष्पा भावे, विलास वाघ, उत्तम कांबळे अशा मंडळींची साथ समितीला लाभली. मध्यंतरी जळगावला आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने वैचारिक संमेलन ठेवले त्यावेळेस डॉक्टर उत्तम कांबळे साहेबांनी केलेलं मार्गदर्शन जमेची बाजू आहे.ही सगळी दाभोलकर आणि अनिसने कमावलेली संपत्तीच आहे. अंधश्रद्धा चळवळीच्या निमित्ताने दाभोलकर सर्वत्र फिरले. यांतून हजारो विवेकवादी कार्यकर्ते जोडले गेले. कोणत्याही चळवळीचं भविष्य हे त्या चळवळीतील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं. समितीच्या आपल्या जळगाव जिल्ह्याचे सुरू असलेले काम महत्वपूर्ण आहे. असे कार्यकर्ते असतील तर कुठल्याही चळवळीला मरण नाही. हे फक्त एक उदाहरण झालं. अशा प्रकारची अनेक काम समितीचे कार्यकर्ते करत आले आहेत.


. डॉक्टर साहेब आपल्यातून गेले यानंतर हळूहळू त्यांच्या कार्याच महत्व ते आपल्यात असण्याचं महत्व माझ्यासारख्या तरुणाला समजत गेलं. इतकं मोठं आणि महत्वाचं कार्य उभं करणाऱ्या दाभोलकरांचा खुन का झाला ?असाही प्रश्न सातत्याने पडत गेला. मग इतिहासात डोकावलं तर कळतं की ही तर जुनीच परंपरा चालत आलीय. गांधींचा खून, आगरकरांची तर पुढे गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. प्रगतशील विचारांना घाबरणारी ही मंडळी आहेत. आम्हाला न पटणारे विचार मांडले, कार्य केलं तर आम्ही तुमचा खुण करू असा मागास विचार समाजात रुजणं ही खूप वेदनादायी आणि लोकशाहीला घातक दुर्देवी गोष्ट आहे. यामुळे आज साहित्यिक, लेखक, कार्यकर्त्यांना सोबत अंगरक्षक घेऊन फिरावं लागतंय. ही गोष्ट किती वाईट आहे.


चळवळीच्या विरोधकांना वाटतं की अनिस फक्त हिंदू धर्मातील प्रथा, परंपरेविरोधात आहे.अनिस कुठल्याही धर्माविरुद्ध नाही.विरोधकांनी असे बरेच गैरसमज पसरवून ठेवले आहेत. दाभोलकरांनी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून, मुलाखतीतून वेळोवेळी अशा प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. प्रश्न तुमचे उत्तरं दाभोलकरांची अशा मुलाखतीतून विविध प्रश्नांविषयी दाभोलकरांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वैचारिक दिशा दाभोलकरांनी मांडलेल्या विचारातून स्पष्ट होते. सारेजण विवेकाची चळवळ पुढे नेण्यासाठी व विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी पुढाकार घेऊया.


वेगवान तपासासाठी ओळखली जाणारी यंत्रणा या थोर समाजसुधारकांच्या दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधारांना शोधून काढेल अशी आशा आजच्या 7 व्या पुण्यतिथीनिमित्त करू या.  सूत्रधार सापडतील तेव्हा सापडतील. सूत्रधारांनी खून का केला हे तर स्पष्ट आहे. डॉक्टर साहेब दाभोलकरांनी सुरू केलेली ही विवेकवादाची चळवळ अधिक व्यापक स्वरूपाची करण्यासाठी सारेजण पुढाकार घेऊया. थोर समाज सुधारक डॉक्टर आज आपल्यात नाही त्यांचा विचार आपण पुढे नेऊ या . थोर समाज सुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समिती, महाराष्ट्र अनिस, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ, वतीने  पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आपला किशोर पाटील कुंझरकर राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समिती. मराठा सेवा संघ ,महाराष्ट्र अनिस.