जळगाव – मध्य प्रदेश सरकारतर्फे मध्यप्रदेशातील तरुणांनाच, स्थानिकांना (भूमिपुत्रांना) त्यांच्याच राज्यात शासकीय विभागामध्ये नोकऱ्या देण्यात येणार आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना महाराष्ट्रातच नोकऱ्या मिळाव्यात. या मागणीचे निवेदन शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
यासाठी तेथील मुख्यमंत्री मा.श्री.शिवराजसिंग चौहान सरकार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय झाल्यास मध्य प्रदेशातीलच तरुणांना त्यांच्याच राज्यात नोकरी करता येईल. इतर राज्यातील तरुण मध्य प्रदेशात नोकरी करू शकणार नाहीत. त्यामुळे या निर्णयामुळे मोठया प्रमाणात भूमीपुत्रांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रमध्ये सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्यातील विविध शासकिय भरत्यामध्ये परराज्यातील तरुण मोठ्या प्रमाणात अर्ज करतात व भरती होतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक भूमिपुत्र शासकीय नोकऱ्यांना मुकतात. परिणामी बेरोजगारी वाढते, त्यांची वये वाढतात. त्यामुळे नैराश्यातून बेरोजगार आत्महत्या करतात. म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना शासकीय नोकरीचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश सरकारप्रमाणे शासकीय नोकऱ्यांमध्ये फक्त स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद, प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार प्रसार अभियानाचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे यांना दिले आहे.