मुक्ताईनगर -- भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुक्ताईनगर तर्फे दहा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. त्याप्रसंगी सदरचे निवेदन नाशिक विभागीय सचिव के. वाय. सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली तर तालुका अध्यक्ष शरद बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधान कर्त्यांनी भारतातील सर्व नागरिकांना समता , स्वातंत्र्य, न्याय , बंधुता प्रदान केले आहेत या मानवी मूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारची आहे . परंतु सदर जबाबदारी व्यवस्थित पार पाडले जात नसल्याने , लोकशाही विरोधी मूल्यांची जपणूक व रुजवणूक केली जात आहे त्यामुळे देशात अनुसूचित जाती ,जमाती, बौद्धान्वर अन्याय अत्याचार यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे . त्यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे. यासाठीच, लोक डाऊन काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पंधरा गंभीर प्रकरणांमध्ये संबंधितांवर योग्य कारवाई केली नाही ,ती करावी. अयोध्या नगरीत समतलीकरण करताना बौद्ध अवशेष सापडले , तरीही बुद्धकालीन साकेतनगरीत बुद्ध विहार बांधण्यासाठी कोणतीही कार्यवाही नाही.इतकेच नव्हे तर न्यायपालिका सुद्धा बौद्ध जनतेची बाजू ऐकायला तयार नाही. नेक पालिकेने या प्रकरणात तथ्य व पुराव्यांवर निर्णय न देता आस्थेवर निर्णय दिला आहे .यामुळे बौद्ध समाजावर घोर अन्याय झाला आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृहा' वर भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यास कठोर शिक्षा व्हावी .तसेच चैत्यभूमी , दीक्षाभूमी, जन्मस्थळ महू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या कोट्यवधींच्या श्रद्धास्थानांना कायमस्वरूपी सुरक्षा देण्यात यावी, चैत्यभूमीला झाकून टाकणारे अनधिकृत बांधकाम पाडून महानगरपालिकेकडून कठोर कारवाई व्हावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई डॉ. आनंद तेलतुंबडे यांना बनावट प्रकरणात अटक करून कारागृहात डांबले.सदर प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन डॉ. तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात यावा.मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळू नये यासाठी सरकारी कंपन्या तसेच काही विभागात खाजगीकरणाचा व कंत्राटी करण्याचा सुरु असलेला घाट थांबवावा , परदेशात उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला उत्पन्नाची अट 6 लाख व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 20 लाख असा भेदभाव पूर्वक अन्याय दूर करावा , केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आय. सी. एस. ई. च्या दहावी इतिहासाच्या पुस्तकात भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच सामाजिक सुधारणा व स्त्रियांचे हक्क प्रदान करणारे व देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा .तसेच नव्या शैक्षणिक धोरणात आरक्षणाच्या तरतुदी बाबत माहिती स्पष्ट करण्यात यावी. अशा प्रकारे दहा मागण्यांचे निवेदन मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पी.एम. पानपाटील यांना देण्यात आले या प्रसंगी नाशिक विभागीय सचिव के.वाय.सुरवाडे , प्रा. संजीव साळवे ,भीमराव पवार , सुनील अढागळे , विश्वंभर अडकमोल , तालुका अध्यक्ष शरद बोदडे , तालुका सचिव चंद्रमणी इंगळे , तालुका कोषाध्यक्ष अमोल वाघ , जनार्दन बोदडे , संजीव पालवे , प्रा. गायकवाड , प्रा. थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मुक्ताईनगर येथे भा. बौ. महासभेतर्फे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन...