जळगाव । जिल्ह्यात सुरू असणार्या पावसाचे आगमनामुळे जळगाव ते अहमदाबाद विमानसेवा पुन्हा रद्द करण्यात आली असून कंपनीने याबाबत घोषणा केली आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे जळगाव ते अहमदाबाद विमानसेवेवर परिणाम झाला आहे. गत महिन्यात ही सेवा काही दिवस सुरू करून बंद करण्यात आली होती. यानंतर ही विमानसेवा १८ ऑगस्टला सुरू होणार असल्याचे ट्रुजेट कंपनीने जाहीर केले होते. त्यासाठी बुकिंग सुरू करण्यात आले होते; परंतु गेल्या ७ दिवसांपासून संततधार सुरू असल्याने विमान कंपनीने ही सेवा रद्द केल्याचे जाहीर केले आहे.
कोरोना संसर्गामुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आल्याने ३ महिने जिल्ह्यातून अहमदाबाद व मुंबई विमानसेवाही बंद होती. जुलै महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने राज्य सरकारने २५ टक्के विमानसेवेला परवानगी दिली. त्यात जळगावात विमानसेवा देणार्या ट्रु-जेट कंपनीने जुलैत पहिल्या आठवड्यात जळगाव- अहमदाबाद ही सेवा आठवड्याच्या सातही दिवसांसाठी सुरू केली होती. विमानाच्या दुरुस्तीच्या कारणाने ही सेवा स्थगित करण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा ही सेवा थांबविण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.