जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहिले थॅलेसेमिया युनिट प्रकाश मुलांचे हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुरु झाले आहे. या युनिट मधून थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांना रक्त संक्रमण करणे तसेच त्यांची फेरिटीन लेव्हल बघून त्यांना चिलेशन गोळ्या मोफत उपलब्ध होणार आहेत अशी माहिती केशव स्मृती प्रतिष्ठान व पटूट संचलित थॅलेसिमिया मुक्त समाज या उपक्रमाच्या प्रमुख डॉ. सई नेमाडे यांनी दिली.
थॅलॅसिमिया बाधित मुलांना रक्तपेढ्यांमधून मोफत रक्त मिळत असले तरी त्यांच्या रक्ताच्या चाचण्या वेळोवेळी केल्या जात नाहीत. त्यात सध्या सरकारी हॉस्पिटल पूर्णपणे कोविड उपचारासाठी उपलब्ध केल्यामुळे थॅलेसिमिया रुग्णांना रक्त संक्रमणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. खाजगी दवाखान्यात नियमित रक्तसंक्रमण करणे आर्थिक अडचणींमुळे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत बालरोगतज्ञ डॉ. अजय शास्त्री यांनी सामाजिक जाणीव ठेवून अत्यल्प दरात रक्त संक्रमणाची सोय उपलब्ध करून दिली.
प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. गौरव महाजन यांनी प्रयत्नपूर्वक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना थॅलॅसिमियाग्रस्त मुलांसाठी सुरू केली. या बालकांना दर १५ ते २०दिवसांनी रक्त द्यावे लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी २५०mg इतके आयर्न शरीरात जमा होत असते. हे आयर्न मुख्यतः हृदय व प्लिहा ह्या अवयवांमध्ये जमा होते. फेरीटीनच्या तपासणीमुळे कळू शकते की आयर्न किती जमा झाले आहे. ते कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात गोळ्या द्याव्या लागतात. वेळोवेळी ही तपासणी केल्याने हृदयावर व प्लिहेवर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
फेरीटीन लेव्हल नियमित तपासल्याने बालकांचे आयुष्यमान वाढण्यास मदत नक्कीच होणार आहे परंतु बोनम्यारो ट्रान्सप्लांट करणे देखील सोपे जाणार आहे. या उपक्रमासाठी परभणी येथील लक्ष्मीकांत पिंपळगावकर, नाशिकचे डॉक्टर प्रकाश पंगम यांचे मार्गदर्शन लाभत असून येत्या काळात थॅलॅसिमियाग्रस्त मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी दिव्यांग विभागाचे दत्तू पाटील यांच्या सहकार्याने प्रयत्न होणार आहेत. थॅलेसेमिया ग्रस्त मुलांच्या पालकांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या नवी पेठ येथील कार्यालयात आरोग्य विभागात त्वरित नोंदणी करावी असे आव्हान माधवराव गोळवलकर रक्त पेढीच्या संचालिका डॉ. सई नेमाडे यांनी केले आहे.