फक्त एक कर्मचारी पॉझिटिव्ह
जळगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत कोरोना चाचणीसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली. एकूण १२२ नमुने तपासण्यात आले, त्यातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. तसेच इतर १२१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दुसरीकडे तपासणीचे प्रमाण वाढविण्याची मागणी होत आहे. तपासणी वाढविल्यास तत्काळ बाधित रुग्णांचा शोध घेऊन उपचार करता येईल. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यास मदत होईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जि.प.ने कर्मचाऱ्यांना एक आठवडा 'वर्क फ्रॉम होम'चे आदेशही दिले होते. जि प चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना चाचणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांची तपासणी झाल्याने आता भीती दूर झाली आहे. मात्र खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते.