पर्यावरण शाळेतर्फे निर्माल्य संकलन केंद्र सुरु!

जळगाव : येथील समर्पण संस्था संचलित पर्यावरणशाळेच्या वतीने मागील १४ वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान अविरतपणे शहरात निर्माल्य संकलन अभियान सुरु आहे. दरवर्षी २ ते ३ टन निर्माल्य जमा करण्यात येत असते. या उपक्रमास जळगाव शहर मनपा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस दलाचे सहकार्य नेहमी लाभत असते.


सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गणेशोत्सवावर देखील परिणाम झालेला आहे. प्रथमच अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे यावर्षी गणरायाला निरोपदेखील तितक्याच साधेपणे दिला जाणार आहे. विसर्जनासाठी होणारी गर्दी व त्यातून कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता यंदा गणेशभक्तांना मेहरूण तलाव व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशास बंदी राहणार आहे. त्यामुळे पर्यावरण शाळेतर्फे गणेशमूर्ती अर्पण आणि निर्माल्य संकलनाचा करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे निर्माल्य संकलित करून जैविक व अजैविक असे वर्गीकरण करून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्यात येते. यामुळे पर्यावरण तसेच निसर्ग संवर्धनास मदत होते.


संस्थेच्याच शिव कॉलनी परिसरातील शारदाश्रम विद्यालय, ७९/१ व २, कोल्हे नगर (प) येथे हे संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे तसेच निर्माल्य संकलन वाहनाद्वारे नागरिकांना संकलनासाठी आवाहन करण्यात येत आहे. नागरिकही घरापासून लांब न जाता गणेशमूर्ती आणि निर्माल्य सदरील केंद्रावर जाऊन अर्पण करीत आहेत. संकलन करतांना स्वयंसेवक गणेशमूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी काळजी घेत आहेत परंतु आपण भक्तिभावाने स्थापन केलेल्या गणरायाचे घरातच विसर्जन करावे असे आवाहनही पर्यावरणशाळेतर्फे करण्यात आले आहे.