*खासगी शाळांच्या फी सवलतीबाबतच्या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद*
पुणे: प्रख्यात स्तंभलेखक आणि पुरोगामी पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री सागर ननावरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयातुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच सदर निवेदन संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचा संदेश ही मुख्यमंत्री कार्यालयाकडून श्री ननावरे यांना प्राप्त झाला आहे.
मुख्यमंत्र्याना केलेल्या निवेदनाच्या या पत्रात कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील खासगी शाळेतील मुलांना शैक्षणिक वर्ष 2020-2021 शालेय शिक्षण प्रवेश फी संदर्भात उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले होते.
सध्या लॉकडाऊन असल्याने उद्योगधंदे आणि सर्वच क्षेत्र बंद आहेत.परिणामी आर्थिक संकटाच्या या काळात
गरीब,मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांच्या मुलांच्या खासगी शाळेतील शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. या काळात खासगी शाळांत ज्यांचे पाल्य आहेत त्यांना भरमसाठ फी भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते.
त्यामुळेच आगामी शैक्षणिक वर्षासाठी दिलासादायक शैक्षणिक धोरण राबवावे ही विनंती या पत्रातुन केली होती.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये विशेष सवलत द्यावी, मोफत शैक्षणिक साहित्य देणे तसेच
टप्प्याटप्प्यात/हप्त्याच्या स्वरूपात फी भरण्यास सवलत देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. तसेच गरज वाटल्यास शैक्षणिक कर्जयोजना सुरु करण्याबाबतचा पर्यायही या पत्रात दिला होता.
पत्राच्या शेवटी 'लवकरच आपण या कोरोनाच्या संकटातुन बाहेर पडू' असा आशावादही सागर ननावरे यांनी मुख्यमंत्र्याना या पत्रातुन केला होता.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे खासगी शाळांत मुले असणाऱ्या पालकांना फी बाबत थोडा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच पालकांच्या हिताच्या कोणत्याही निर्णयाचे स्वागतच असेल असे निवेदक सागर ननावरे यांनी सांगितले.