जळगाव - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनो चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्हा दि २३ पासून लॉकडाउनचे आदेश आज काढले आहेत. हे आदेश मात्र जीवनावश्यक वस्तू व सेवा भाजीपाला औषधालय यासाठी हे लागू असणार नाही.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात सोमवार, दि. 23 पासून सोने-चांदीचे दुकाने, खेळण्याची दुकाने, हॉटेल, सर्व ढाबे, इलेक्ट्रॉनिक दुकाने , झेरॉक्स दुकाने, फोटो स्टुडिओ, खाद्यपदार्थांच्या गाड्या, वडापाव अंडा बिर्याणीच्या गाड्या, आईस्क्रीम पार्लर, आईस कँडीची दुकाने, ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने,वॉटर पार्क, खेळाची ठिकाणे, फटाका दुकान इतर तत्सम दुकाने दि.23 मार्च पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. हे आदेश जीवनावश्यक वस्तू जसे की, औषधे, भाजीपाला, अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.
देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 298 वर पोहोचला असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रामध्येही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्या आता 63 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आज 21 मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही 63 वर पोहोचली आहे. गुरुवारी ही संख्या 52 वर होती. त्यामुळे गेल्या 24 तासांत 11 नवीन रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे.
कोरोना बाधित रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी
जर राज्यनिहाय आकडेवारी बघितली तर, आंध्र प्रदेशात 3, छत्तीसगडमध्ये एक, दिल्लीत 26, गुजरातमध्ये 13, हरियाणामध्ये 20, हिमाचल प्रदेशात 2, कर्नाटकात 18, केरळमध्ये 40, मध्य प्रदेशात 4, महाराष्ट्रात 63, ओडिशामध्ये 2, पुडुचेरीमध्ये एक, पंजाबमध्ये 6, राजस्थानमधील 23, तमिळनाडूमध्ये 3, तेलंगणामध्ये 21, चंडीगडमध्ये 5, लडाखमध्ये 13, उत्तर प्रदेशात 4, उत्तराखंडमध्ये 4 आणि पश्चिम बंगालमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत. यातील 28 नागरिक कोरोना व्हायरसपासून ठीक झाले आहेत.