नवी दिल्ली ( वि.प्र.) - दिल्लीत 2012 मध्ये अत्याचाराचा बळी पडलेल्या निर्भयाच्या चारही दोषींना आज सकाळी 5.30 वाजता तिहार जेलमध्ये अखेर फाशी देण्यात आली.
दिल्लीत अत्याचाराचा बळी पडलेल्या निर्भया 2012 पासून न्यायाची वाट पाहत होती आज अखेर साडेसात वर्षानंतर न्याय मिळाला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री 12.00 वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते. दोषींना फासावर लटकवल्यानंतर डॉक्टरांचं पथक जेलमध्ये दाखल झालं. चारही दोषींना मृत्यू घोषीत केले. त्यानंतर दोषींचे मृतदेह दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले जातील. मग दिन दयाल उपाध्याय रुग्णालयात त्यांचं शवविच्छेदन केलं जाईल.
आरोपींना फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया :-
आज आमचा सात वर्षाचा संघर्ष यशस्वी झाला आहे. देशात प्रथमच चार जणांना फाशी देण्यात आली, आम्हाला न्याय मिळाला पण उशीराचा न्याय मिळाला. यासाठी देशाचे सरकार, राष्ट्रपती आणि न्यायालयांचे आभार. आमच्या मुलीचे जे झाले त्यावरून संपूर्ण देश लज्जित झाला, परंतु आता या दोषींना फाशी देण्यात आली आहे, तर इतर मुलींनाही न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. या निर्णयावर निर्भयाची आई आशा देवी यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की आज सात वर्षाचा संघर्ष पूर्ण होत आहे. यापुढे इतर निर्भयासाठी असेच प्रयत्न करीत राहील.
... ही शिक्षा दुष्कृत्याचा विचार करणाऱ्यांसाठी इशारा -उज्ज्वल निकम
कठोर शिक्षा जेव्हा देतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात. कायद्यामध्ये संशोधनाची गरज आहे.जर कोणी कायद्याशी खेळतं किंवा चॅलेंज करतं ते चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी याचिका कितीवेळा केली पाहिजे यावर विचार झाला पाहिजे. रिव्ह्यू पिटीशनसाठीही मर्यादा असायला हवी, असं मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं.
१६ डिसेंबर २०१२ ते 20 मार्च 2020 पूर्ण घटनाक्रम :-
दिल्लीतील मुनीरका भागात १६ डिसेंबर २०१२ रोजी ६ जणांनी एका पॅरामेडिकलचे शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. निर्भयासोबत तिचे मित्रही होता. मात्र त्यांना मारहाण करून चालत्या बसमधून बाहेर फेकण्यात आलं.
१८ डिसेंबर २०१२ दिल्ली पोलिसांनी राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केली
२१ डिसेंबर २०१२ दिल्ली पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह सहावा दोषी अक्षय याला अटक केली.
२९ डिसेंबर २०१२ निर्भयावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तिला सिंगापूरला पाठवण्यात आलं. सिंगापूरला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
३ जानेवारी २०१३ पोलिसांनी पाच जणांविरोधात सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि लूटमार या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला.
१७ जानेवारी २०१३ फास्ट ट्रॅक कोर्टाने पाचही दोषींवर आरोप निश्चित केले
११ मार्च २०१३ तिहार तुरुंगात या प्रकरणातला आरोपी राम सिंह याने आत्महत्या केली
३१ ऑक्टोबर २०१३ या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल बोर्डाने दोषी ठरवलं आणि त्याची रवानगी तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली
१० सप्टेंबर २०१३ फास्ट ट्रॅक कोर्टाने मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला दोषी ठरवलं
१३ सप्टेंबर २०१३ कोर्टाने चारही दोषींना म्हणजेच मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला फाशीची शिक्षा सुनावली
१३ मार्च २०१४ दिल्ली हायकोर्टानेही चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली
१५ मार्च २०१४ सुप्रीम कोर्टानेही या चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
२० डिसेंबर २०१५ अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून घरी पाठवण्यात आलं. ज्याविरोधात देशभरात आंदोलनं करण्यात आली
२७ मार्च २०१६ सुप्रीम कोर्टाने दोषींच्या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला
५ मे २०१७ सुप्रीम कोर्टाने चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण हे सुनामी इतकंच भयंकर आहे असंही मत कोर्टाने नोंदवलं.
९ नोव्हेंबर २०१७ मुकेशने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार व्हावा म्हणून याचिका दाखल केली. जी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
डिसेंबर २०१९ अडीच वर्षाने दोषी अक्षय याने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली
डिसेंबर २०१९ निर्भयाच्या आईतर्फे सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली
७ जानेवारी २०२० दिल्लीतील न्यायालयाने चारही दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल असं डेथ वॉरंट जारी केलं
८ जानेवारी २०२० पवन ने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली. त्यानंतर मुकेशनेही हेच पाऊल उचललं
१४ जानेवारी २०२० मुकेशने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. जो राष्ट्रपतींनी फेटाळून लावला. मात्र दया याचिका केली असल्याने २२ जानेवारीची फाशीची तारीख टळली आणि कोर्टाने १ फेब्रुवारी सकाळी ६ वाजतासाठीचं नवं डेथ वॉरंट जारी केलं.
३० जानेवारी २०२० एक एक करुन पवन, अक्षय आणि विनय यांच्यातर्फे कायदेशीर डावपेच खेळले गेले ज्यामुळे १ फेब्रुवारीचं डेथ वॉरंट रद्द करण्यात आलं आणि पटियाला हाऊस कोर्टाने ३ मार्चचं डेथ वॉरंट जारी केलं.
२ मार्च २०२० पवन गुप्ताने पुन्हा एकदा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. ज्यामुळे ३ मार्चलाही होणारी फाशी रद्द झाली. त्यानंतर २० मार्च रोजी फाशी देण्यात येईल असं डेथ वॉरंट काढण्यात आलं
१९ मार्च २०२० निर्भयाच्या दोषींचे वकील यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. दोषींची फाशी टळावी म्हणून सिंग यांनी म्हणून बरेच प्रयत्न केले मात्र तारीख टळली नाही.