छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम 13 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान राबविण्यात येणार


जळगाव, दि. 18 (जिमाका) - भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात दिनांक 13 मार्च ते 15 एप्रिल, 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे.


      या अभियानांतर्गत 1 जानेवारी, 2020 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण झालेली व्यक्ती व यापूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ठ नसलेली व्यक्ती आपल नाव मतदार यादीत नोंदवू शकेल. त्यासाठी त्या व्यक्तीने आपले रहिवासी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे किंवा संबंधित तहसिल कार्यालयात विहीत अर्ज नमुना क्र. 6 भरून द्यावयचा आहे. याशिवाय मतदारांना NVSP पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. दिनांक 28 व 29 मार्च तसेच 11 व 12 एप्रिल, 2020 या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


        तरी सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरीक तसेच शैक्षणिक संस्था आणि राजकीय पक्ष यांनी या मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवून मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.